महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत 'सूर्यदत्त'च्या दर्श शिंदेला सुवर्णपदक



पुणे : बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग प्रकारात सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या दर्श शिंदेने सुवर्णपदक पटकावत सूर्यदत्त परिवार व त्याच्या कुटुंबियांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, प्राचार्या वंदना पांडे यांनी दर्शच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले. 


महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा नुकतीच आयोजिली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. विविध ३९ क्रीडा प्रकारात ८००० पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.


वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दर्श शिंदे स्केटिंग करत असून त्याला स्केटिंगचा १४ वर्षांचा अनुभव आहे. सुरुवातीला स्पीड स्केटिंग करत असलेल्या दर्शने २०१६ पासून इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग प्रकारात प्राविण्य मिळवले आहे. या खेळासाठी त्याचे वडील श्रीपाद शिंदे त्याला प्रशिक्षण व मार्गदर्शन करत आहेत.


दर्शने याआधी चीनमधील नानजिंग येथे २०१७ मध्ये वर्ल्ड रोलर गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आजवर त्याने सहा फेडरेशन नॅशनल चॅम्पियनशिप खेळल्या असून, २०२२ मध्ये अहमदाबाद गुजरात येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेत त्याला रौप्य पदक मिळाले होते. फेडरेशन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, तर चार रौप्य पदकांची कमाई केलेली आहे.


प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "सूर्यदत्तमध्ये नेहमीच विद्यार्थ्यांतील कला-क्रीडा गुणांना प्रोत्साहन दिले जाते. अभ्यासक्रमासह इतर उपक्रमांत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अतिशय महत्वपूर्ण योगदान देतात. त्यातून त्यांची जिंकण्याची व खिलाडूवृत्ती वाढते. त्यामुळे सूर्यदत्त फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमी (एसएफएसए) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते."

Post a Comment

0 Comments