...पण आपण छत्रपती शिवरायांचे `शब्दस्मारक` उभारणार

पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला विश्वास; मावळभूषण कृष्णराव भेगडे 

व्याख्यानमालेचे उदघाट्न 



पिंपरी / पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा राज्य शासनाचा संकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. कदाचित त्यासाठी माझी ताकद कमी पडत आहे. मात्र, माझ्याकडे शब्दसंपत्ती भरपूर आहे आणि त्याच संपत्तीतून महाराजांचे ‘शब्दस्मारक’ उभारण्याचा संकल्प मी येत्या तीन-चार वर्षात नक्की पूर्ण करणार आहे, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी राज्य शासनाला शाब्दिक चिमटे काढले. राजकीय मंडळींनी मतांसाठी खोटा इतिहास सांगू नये, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. 


तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना 'पानिपत, चंद्रमुखी ते महासम्राट शिवाजी' असा आपल्या कादंबरी लेखनाचा प्रवास उलगडून दाखवला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, शैलेश शाह,


विलास काळोखे, निरूपा कानिटकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, सत्यशीलराजे दाभाडे, विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, तळेगावमधील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दाभाडे यांना सामाजिक कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


आपल्या कादंबरी लेखनाचा प्रवास उलगडून सांगताना विश्वास पाटील म्हणाले, की त्या-त्या काळातील ज्या व्यक्तींमुळे मोठे सामाजिक परिवर्तन घडून आले, त्यांच्या कर्तृत्वाचा धागा मी पकडत गेलो. त्या नजरेतूनच मी त्या काळी 'पानिपत' (१९८८) लिहिले. 'भारतीय ज्ञानपीठ'चे तत्कालिन अध्यक्ष नरसिंह राव यांच्या पाहण्यात ते आले. त्यांनी त्याच्या भाषांतराला प्रोत्साहन दिले.


'पानिपत' लिहिताना मी भाऊसाहेबांची समाधी शोधण्यासाठी ऊसाच्या शेतात तीन-चार दिवस शोध घेतला. ती कादंबरी आल्यानंतर आता दरवर्षी १४ जानेवारीला हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दीड लाख मराठे गोळा होतात. मराठी लेखणीचा हा प्रभाव आहे. एका साहित्यिकासाठी ही सन्मानाची बाब आहे. यापेक्षा जास्त काय हवे ? या पुढील काळातही कथा, कादंबऱ्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या व्यथा मांडायच्या आहेत. 


पाटील पुढे म्हणाले, की लेखकांनी इतरांच्या आयुष्यात डोकावून बघायला हवे. त्यांच्या अनुभवातून शिकायला हवे. आपल्या शब्दांवर विश्वास ठेवायला हवा. मराठी वाचक चानाक्ष आहेत. लेखनातील केसाएवढीही चूक ते खपवून घेणार नाहीत. म्हणून लेखकाने समाजात जे जे नवे दिसते, ते टिपले पाहिजे. चंद्रमुखी कादंबरीचे परीक्षण प्रयत्न करूनही कोणत्याही वृत्तपत्रात छापून येऊ शकले नाही, याची खंत आहे. लेखक झाल्यावर एवढे मात्र समजले, की लेखकाने जीवनात कळा व वेदना जिरवायला शिकले पाहिजे. चित्र - विचित्र माणसांच्या सानिध्यात लेखन वाढत असते. 


छत्रपती शिवरायांजवळ भवानी तलवारीपेक्षाही मोठी बुद्धीची तलवार असल्याने त्यांनी त्या काळात अनेक शत्रूंवर यशस्वी मात करीत स्वराज्याची निर्मिती केली. शिवाजी महाराज आणखी दहा वर्षे असते, तर मराठ्यांची घोडदौड लंडन, पॅरिसपर्यंत पोहोचली असती. दिव्यदृष्टी व पारखी नजर म्हणजे शिवाजी महाराज होते. अंतर्गत विरोध असूनही त्याही परिस्थितीत त्यांनी स्वराज्य निर्माण केले, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले. 


प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले, की इंद्रायणी महाविद्यालय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील अग्रगण्य महाविद्यालय आहेत. भारतातले एकमेव महाविद्यालय आहे ज्याने जागतिक पातळीवर भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. मावळातील 50 गावांचे विद्यार्थी या महाविद्यालयात शिकत आहेत. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या विचारांचा वारसा या महाविद्यालयाला लाभला आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे काम त्यांनी केले. देश, समाज, कुटुंबाला पुढे नेणारा तरुण तयार करण्याचे ध्येय हेच या व्याख्यानमालेचे मुख्य उद्दिष्ट आहे.


पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी, सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी, तर आभार संचालिका निरुपमा कानिटकर यांनी मानले. 


Post a Comment

0 Comments