नागपूर ते मुंबई इन्सानियत अभियान रॅलीचे शिवजयंतीपासून आयोजन
पुणे : धर्मा-धर्मातील द्वेष संपविण्यासाठी भाईचार्याचा संदेश घेऊन इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अल इन्साफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुफ्ती सालम चाऊस आणि युक्रांदचे उपाध्यक्ष संदीप बर्वे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
इन्कलाबचा नारा देऊन शिवजयंती दिनी ही पदयात्रा, नागपूर ते मुंबई अशी निघणार आहे. 25 दिवसांची ही रॅली असून ती नागपूरहून अहमदनगर, पुणे जिल्हा मार्गे मुंबईला जाणार आहे. ही रॅली २ ते ५ मार्च दरम्यान पुणे जिल्ह्यात प्रवास करेल. पदयात्रा समारोप मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात होणार आहे.
पत्रकार परिषदेला अल इन्साफ फाऊंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती सालम चाऊस, युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष संदीप बर्वे, रहमत सुलतान फाऊंडेशनचे अध्यक्ष युनूस तांबटकर, मुस्लीम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार, जमियत उलमा इ हिंदचे हाजी गुलझार शेख, अपना वतन संघटनेचे सिद्दीक शेख, ऑल इंडिया मदारी जमातचे हाजी अक्रम मदारी, जमियत उलेमा, पुणेचे शोएब अन्सारी आदि उपस्थित होते.
धर्मांधतेविरोधात इन्कलाबचा हा नारा असून, यामध्ये 40 सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याची सहमती दर्शवली आहे.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी यावर क्लिक करा...
मुफ्ती सालम चाऊस म्हणाले, 'पाकिस्तान, चीन या शत्रू राष्ट्रापेक्षा राजकारणासाठी देशात पसरत असलेली जातीय व धार्मिक विषमता अधिक घातक ठरत आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात जातीय द्वेष व एकमेकांबद्दल दुरावा निर्माण केला जात आहे. देशात अशांतता, द्वेष, जातीय मोर्चे, भडकाऊ भाषणे, दंगे यामुळे देश प्रगती साधू शकत नाही. धर्म-धर्मातील व समाजातील द्वेष संपविण्यासाठी व प्रेम, शांतता आणि भाईचार्याचा संदेश घेऊन नागपूर ते मुंबई इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे '.
या इन्सानियत अभियान रॅलीत राजकीय पक्ष व धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत. देशाच्या एकता, अखंडता व एकात्मतेसाठी हे अभियान आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन देशातील शांततेसाठी सर्वांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
देश हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मातृभूमी असलेल्या देशाप्रती प्रत्येक मुस्लिम बांधवांचे प्रेम आहे, याबद्दल कोणाला देशभक्तीचा पुरावा देण्याची गरज नाही. योगायोगाने या अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनापासून सुरु होत असल्याचा आनंद आहे.
शिवाजी महाराजांचा लढा मुघलांविरोधात होता, मुस्लिम विरोधात नव्हता. मात्र समाजात शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी असल्याचे चित्र रंगविण्याचे काम सुरु आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक महत्त्वाची जबाबदारी मुस्लिम सरदारांवर होती. जातीय द्वेष पसरविण्यासाठी चुकीचा इतिहास समोर आनला जात असल्याचे मुफ्ती सालम यांनी स्पष्ट केले.
0 Comments