संपन्न आणि सशक्त समाजासाठी मंदिरे टिकवावीत : बाबूजी नाटेकर

मंदिर तेथे ध्वज अभियानांतर्गत पंधरा हजार ध्वजांचे पूजन ; विहिंप मठ मंदिर संपर्क समितीतर्फे आयोजन



पुणे : मंदिर ही समाजाची अस्मिता आहे. हे आपल्यापेक्षा जास्त आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांना समजले. त्यामुळे त्यांनी हिंदू समाजाची श्रद्धास्थाने, अस्मिता असणारी मंदिरे धुळीला कशी मिळतील याचा विचार केला. सामर्थ्य संपन्न आणि सशक्त समाजासाठी मंदिरे टिकली पाहिजेत. मंदिरे समाजाची शक्तीस्थाने झाली पाहिजेत, असे मत विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर यांनी व्यक्त केले. 


विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क समिती, पश्चिम महाराष्ट्रच्यावतीने मंदिर तेथे ध्वज या अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रमुख मंदिरात प्रत्येकी एक याप्रमाणे पंधरा हजार ध्वज उभारले जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात भवानी पेठेतील भवानी माता मंदिरात डॉ. मनिषा शेटे यांच्या हस्ते ध्वजपूजनाने झाली. यावेळी संजय मुरदाळे, मनोहर ओक उपस्थित होते.


बाबूजी नाटेकर म्हणाले, ध्वज पूजन हा केवळ एक कार्यक्रम नाही तर हिंदू समाजाची अस्मिता जागृत करण्यासाठी हा पुढाकार आहे. मंदिर हे केवळ पूजापाठासाठी नाही तर ती समाजाची अस्मिता आहे. समाज दुबळा करण्यासाठी मंदिरे पाडली. समाजाची शक्ती एकत्र यायला पाहिजे त्यासाठी मंदिरामध्ये प्रबोधनाची गरज आहे. शक्ती ही भक्ती मध्ये आहे त्यामुळेच मंदिरे जागृत केली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.


डॉ. मनीषा शेटे म्हणाल्या, ध्वज हे संस्कृतीचे मानचिन्ह आहे. जगातील प्रत्येक राष्ट्राचा आणि धर्माचा विचार केला तर प्रत्येकाचे चिन्ह ध्वज आहे. आपण सगळे एक होण्यासाठी ध्वज हे आपले प्रतीक असावे. अशा भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन आपल्या राष्ट्रासाठी काम करा.


संजय मुरदाळे  म्हणाले, मंदिर हे धर्माचे रक्षण केंद्र आहे धर्म टिकून राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मंदिर आणि त्यासोबतच कुटुंब. पूर्वी मंदिर हे समाजाचे नियंत्रण करीत असे. महाराष्ट्राचा विचार केला तर सव्वा दोन लाख पेक्षा अधिक मंदिरे आहेत त्यातील काही मंदिरे दुर्लक्षित आहेत अशा मंदिरांचा जिर्णोद्धार करणे, त्याचे पावित्र्य राखणे आणि मंदिराचे वैभव पुन्हा निर्माण केले पाहिजे. धर्माचे ज्ञान मंदिरातूनच मिळायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.


मनोहर ओक म्हणाले, विश्व हिंदू परिषद मठ मंदिर समितीच्या वतीने घर घर भगवा ध्वज असा उपक्रम राबवला जात आहे. हिंदू संस्कृती टिकून राहावी आणि वाढावी यासाठी प्रत्येक घरावर मंदिरावर भगवा ध्वज फडकला पाहिजे. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. पुढील तीन वर्षात १२ लाख घरांपर्यंत ध्वज लागतील असे ठरवले आहे. एकूण बारा लाख घरांपर्यंत हिंदुत्वाचा विचार जावा, हा मुख्य उद्देश अभियानामागे आहे

Post a Comment

0 Comments