एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे प्रतिपादन : अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते
प्रतिष्ठान तर्फे माऊली व प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : पुढची पिढी घडविण्यात पुण्याचे मोठे योगदान आहे. राजामाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे अशी अनेक उदाहरणे आपण याच मातीत पाहिली आहेत. भारत सर्वात तरुण देश आहे. हे आपण अभिमानाने सांगतो. पण पुढील ३५ वर्षाने वृद्ध होणारा देश भारत असेल. पुण्यात अनेक वृद्धाश्रम झाले आहेत, ही त्याचीच सुरुवात आहे. समाज असा का होतो आहे? यामध्ये पुरुषार्थ काय? हा विचार आपण करायला हवा, असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठान तर्फे माऊली व प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ऍड. सुभाष मोहिते, दिलीप मोहिते, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. सोहळ्याचे यंदा ५ वे वर्ष आहे.
यंदाचा माऊली पुरस्कार दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या मातोश्री सुनिता लांजेकर यांना आणि प्रेरणा पुरस्कार अहमदनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, आज समाजात दिसणारे चित्र वेगळे आहे. आई - वडिलांकडे मुले दुर्लक्ष करीत आहेत. पुण्यात वृद्धाश्रम पाहिले की वाईट वाटते. यावरून आपण स्वराज्य मिळाल्यानंतरही त्याला सुराज्य करू शकलो नाही, हे दिसते. आपण इतिहासासोबत नागरिकशास्त्राचा विसर पडला आहे. नागरिक घडविण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अनिल कवडे म्हणाले, आईने केलेल्या संस्कारातून मिळणाऱ्या कृतज्ञतेची भावना प्रत्येकाने समाजात पोहोचविणे हे महत्वाचे आहे. चांगल्या विचाराने प्रेरित होऊन समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजात मानवतेच्या भावनेने काम करणे अवघड आहे. त्यामुळे माऊली प्रतिष्ठान सारख्या संस्था प्रेरणास्रोत आहेत. आव्हानात्मक काम करणारी माणसे आहेत, म्हणून देश जिवंत आहे.
ते पुढे म्हणाले, रस्ते, पाणी असा आपला भौतिक विकास झाला. मात्र, माणसाचे विचार, आचार कसे झालेत हा प्रश्न कायम आहे. विज्ञानाने जीवन सुलभ केले. पण माणसाला मनाची शांती, चांगले विचार आहेत का, हे पाहणे गरजेचे आहे. जीवन व विचार, आचाराची शाश्वतता पाहणे गरजेचे आहे.
डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले, माऊलीचे कर्तृत्व, अंतर्मन काय असते, याची उदाहरणे समाजात आहेत. आईचे संस्कार आम्हाला पुढे घेऊन गेले. त्यांचे संस्कार, विचार हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचे असतात. रस्त्यावरच्या महिलांची माणूस म्हणून ओळख नसते. त्यांना आधार देण्याचे काम माऊली सेवा प्रतिष्ठान करीत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर तीच परिस्थिती आहे. महिलांवर होणारे अत्याचार ही आजची भयाणता आहे. त्याच परिस्थितीत माऊली प्रतिष्ठानचे कार्य सुरु असून चेहरा नसलेल्या महिलांसाठी सातत्याने काम सुरु राहिल.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल मोहिते, विराज मोहिते, विक्रांत मोहिते, सारिका खराडे, श्रद्धा झंझाड, श्वेता ढमाळ, शीतल देशमुख, ऍड. वृषाली जाधव, ऍड. सुखदा मोहिते, कृतिका मोहिते, सचिन धुमाळ, भाग्यश्री मोहिते, शिवाली मोहिते आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. श्वेता ढमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत मोहिते यांनी आभार मानले.
0 Comments