ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव ; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामराव गोगावले
यांच्या लव्हाळा या आत्मचरित्राचे प्रकाशन
पुणे : इतिहासाच्या पोटात अनेक बारकावे आहेत. आजचे समाजकारण, राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरु आहे. भारत देश घडवायचा असेल, तर सामुदायिक प्रयत्न करायला हवेत. इतिहास समजून घेत, संशोधन करायला हवे. आपण इतिहास लिहून ठेवत नाही, सांगत नाही.
यामुळे काय होते, हे आज आपण पहात आहोत. त्यामुळे इतिहासाच्या पाऊलखुणा उजेडत आणण्याचा प्रयत्न करीत तो समाजापुढे आणायला हवा, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामराव गोगावले यांच्या `लव्हाळा` या आत्मचरित्राचे प्रकाशन हडपसरमधील अॅमेनोरा पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पांडुरंग खेसे, जगन्नाथ शेवाळे, महादेव बाबर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, माजी नगरसेवक रामदास तुपे, प्रा.जे.पी.देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात रामराव गोगावले यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच श्री शिवाजी मराठा सोसायटीला रुपये १ कोटी आणि हडपसरमधील यश हॉस्पिटलला रुपये ११ लाख अशी देणगी गोगावले व विधाते परिवारातर्फे देण्यात आली.
डॉ.बाबा आढाव म्हणाले, मुंढवा, घोरपडी, हडपसर असे उपनगरांतील परिसर कसे निर्माण झाले. या भागाच्या माहितीची शब्दबद्धता नाही. येथील इतिहास व घटनांना खूप मोठे महत्व आहे.
रामराव गोगावले यांच्यासारखी यशस्वी व्यक्तिमत्वे या मातीत कार्यरत आहेत, हे समाजापर्यंत पोहोचायला हवे. समाजवादी चळवळीने आम्हाला संस्कार दिले. त्यामुळे आम्ही व्यसनाला स्पर्श देखील केला नाही.
चेतन तुपे म्हणाले, साहित्यिक अण्णा म्हणजेच रामराव गोगावले, अशी त्यांची वेगळी ओळख व पैलू आहे. वयाची ८६ वर्षे त्यांनी समाजाची सेवा केली आहे, आता आत्मचरित्र लेखनाच्या पुढच्या टप्प्यात त्यांनी साहित्याची सेवा करावी, असेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्वांनी जीवनात जे पाहिले, अनुभविले ते पुढील पिढीला समजणे गरजेचे आहे. ते आत्मचरित्रासारख्या माध्यमातून पोहोचत असल्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. कांचन विधाते यांनी प्रास्ताविक केले. प्रा.नितीन लगड यांनी सूत्रसंचालन केले. जयप्रकाश जाधव यांनी आभार मानले.
0 Comments