भाजप प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय : भाजपच्या छत्रपती शिवाजीनगर
मतदार संघाच्या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन
पुणे : कोणत्याही नेत्याने कार्यकर्त्यांना सोबत घेतले तर पक्ष संघटना अधिक बळकट होते याचे हे जिवंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पुढील एक-दोन वर्ष नव्हे तर २५ वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाच्या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर,
गणेश बगाडे, प्रतुल जागडे, आनंद छाजेड माजी नगरसेवक दत्ता खाडे, नगरसेविका जोत्स्ना एकबोटे नीलिमा खाडे, अर्चना मुसळे, प्रकाश ढोरे, आदित्य माळवे आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुरलीधर मोहोळ यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
श्रीकांत भारतीय म्हणाले,पुण्यामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांची नवीन पिढी तयार होत आहे ही पक्षासाठी जमेची बाजू आहे. आपण जनतेला आपल्या कामाचे उत्तरदायित्व देणे लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे यामुळेच त्यांनी आपले काम जनतेसमोर यावे यासाठी अहवाल प्रकाशन केले आहे.
सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, पक्ष संघटनेमुळेच मी नगरसेवक आणि आमदार होऊ शकलो याची मला निश्चितच जाणीव आहे. यामध्ये कार्यकर्ता आणि संघटनेचे मोठे योगदान आहे. पक्ष संघटना ही कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होते आणि त्यातूनच नेतृत्व घडते त्यामुळे कार्यकर्त्यांमुळे छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला निश्चितच बनणार आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, संघटना म्हणून एकदिलाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष हा पुण्यामध्ये अधिक मजबूत होत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे केवळ माझ्या एकट्याचे यश नाही तर कार्यकर्त्यांचे आणि संघटनेचे बळ माझ्या पाठीशी होते त्यामुळेच हे शक्य होऊ शकले.
राजेश पांडे म्हणाले,राज्य आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे या सरकारच्या विविध योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा पक्षाशी जोडला जाईल आणि पक्ष अधिक मजबूत होऊ शकेल. गणेश बगाडे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र साळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. सुनील पांडे यांनी आभार मानले.
0 Comments