पुणे परिमंडलातील स्थिती
पुणे : नवीन वीजजोडण्यांसाठी पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये सूक्ष्म नियोजन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये दर आठवड्यामध्ये दोनदा नवीन वीजजोडण्यांसह विभागनिहाय वीजमीटरच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे व आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या नियोजनामुळे कोटेशनची रक्कम भरलेल्या (पेडपेंडिंग) तसेच पायाभूत यंत्रणा अस्तित्वात असलेल्या ठिकाणी नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाली आहे.
दरम्यान, पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्रीफेजचे एकूण ३१ हजार ५०५ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत तर कोटेशनची रक्कम भरलेल्या व पायाभूत यंत्रणा अस्तित्वात असलेल्या ९ हजार ५९१ अकृषक ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्या देण्याची कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्यासाठी सर्वच १२ विभागांमधील नवीन वीजजोडणी तसेच वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत परिमंडलस्तरावरून दर सोमवारी व गुरुवारी विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे.
नवीन वीजजोडणी देण्यासोबतच नादुरुस्त मीटर बदलायचे आहेत त्या विभागात पुरेशा संख्येत व तातडीने नवीन मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रक्रियेचा दर सोमवारी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार स्वतंत्रपणे आढावा घेत आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याच्या गतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, पद्मावती, पर्वती, नगररोड, बंडगार्डन, मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागांमध्ये सोमवार (दि. २३)पर्यंत सिंगल फेजचे २१ हजार ८२ तसेच थ्री फेजचे १० हजार ४२३ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. तर या तुलनेत सर्वच १२ विभागांमध्ये पायाभूत यंत्रणा अस्त्तित्वात असलेल्या सिंगल फेजच्या ७ हजार ७०५ आणि थ्री फेजच्या १ हजार ८८६ अशा एकूण ९ हजार ५९१ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहेत.
गेल्या जानेवारी ते डिसेंबरपर्यत महावितरणकडून तब्बल एक लाख ७७ हजार १८६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती- १ लाख ४६ हजार ७८, वाणिज्यिक- १९ हजार ८५९, औद्योगिक- ३५०४ आणि कृषी व इतर ७ हजार ४५५ अशा एकूण १ लाख ७६ हजार ८९६ तर उच्चदाब वर्गवारीमध्ये २९० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नवीन मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणच्या संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. सोबतच पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याने वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0 Comments