राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध
अजिंठा वेरूळ लेण्यांतील शिल्पांच्या संकल्पनेतील रंगमंच यावर्षीचे खास आकर्षण
.jpeg)
पुणे : पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या १६ व्या ‘वसंतोत्सव’ला आज (दि.२० जानेवारी) म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी बहारदार सुरुवात झाली.
पं. अजॉय चक्रबर्ती यांच्या कन्या व पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती यांनी आपल्या सुरेल गायनाने महोत्सवाला आरंभ केला.
यावेळी डॉ वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे विश्वस्त बापू देशपांडे, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर, पू ना गाडगीळ अँड सन्सचे अजित गाडगीळ, सूर्यकांत काकडे संस्कृती प्रतिष्ठानचे विजय काकडे, लोकमान्य मल्टीपर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव व भालचंद्र कुंटे, एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या लिबरल आर्ट्स विभागाच्या प्रमुख डॉ प्रीती जोशी आदी उपस्थित होते.
यावर्षीच्या महोत्सवात कै. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे. याबरोबरच अजिंठा वेरूळ लेण्यांतील शिल्पांच्या संकल्पनेवर आधारित रंगमंच व्यवस्था हे यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
गायिका कौशिकी चक्रबर्ती यांनी राग मधुवंतीने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी 'श्याम भये घनश्याम नही आहे मोरे द्वारे...' ही विलंबित तीन तालातील रचना प्रस्तुत केली.
यावर्षीचा पुण्यातील माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे असे सांगत कौशिकी पुढे म्हणाल्या, "पुणेकरांनी मला नेहमीच प्रेम दिले आहे. आज पुन्हा पुणेकर रसिकांसमोर गाण्याची मिळत असलेली संधी माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. वसंतोत्सव मधील आजचे गायन माझ्यासाठी खास आहे कारण आज पुण्यातच मी राहुल देशपांडे यांसोबत पहिल्यांदा एकत्रित गायन करणार आहे. दडपण आहे, पण आम्ही दोघांनी यासाठी खूप मेहनत घेतली असल्याने आज तुमच्यासमोर येत आहोत."
पुण्यात येऊन जर तुम्हाला आशीर्वाद मिळाला तर तुम्ही काही गाऊ शकता असा कलाकारांचा अनुभव आहे. मी गेली १५ वर्षे पुण्यात कार्यक्रमाच्या माध्यमातून गायनसेवा सादर करीत आहे, तरीही प्रत्येक वेळी काय नवीन सादर करता येईल याचा कटाक्षाने विचार करत असते. येथे असलेला रसिक वर्ग खास असल्याने मनावर कायमच दडपण असते, असेही कौशिकी यांनी नमूद केले.
यांनतर त्यांनी 'गुरू चरण ध्यान धरे... ' ही झपतालातील तर 'काहे मन करो सखिरे...' ही तीन तालातील रचना सादर केल्या. कौशिकी यांना ईशान घोष (तबला), तन्मय देवचके (संवादिनी), मुराद अली खान (सारंगी) तर अंतरा नंदी व सई हातेकर यांनी स्वरसाथ केली.
यानंतर स्व. पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त महोत्सवादरम्यान देण्यात येणारा ‘वसंतोत्सव पुरस्कार’ यंदा ग्वाल्हेर-आग्रा परंपरेतील ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी शुभदा पराडकर, संगीत संशोधिका व लेखिका डॉ. शुभदा कुलकर्णी आणि युवा तबलावादक कार्तिकस्वामी दहिफळे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे ९ वे वर्ष असून, संगीत शिक्षक व संशोधक यांना मानपत्र व रोख ५१,००० रुपये तर युवा कलाकारास मानपत्र व रोख २५,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यांनतर राहुल देशपांडे यांनी राग कौशी मध्ये आपल्या गायनाला सादर केले. त्यांनी 'खेलन आयो री...' ही एकतालातील बंदिश गायली. याबद्दल बोलताना ते म्हणाले ही बंदिश कुमार गंधर्व यांची असून माझे गुरू मुकुल शिवपुत्र यांकडून मी ती शिकलो आहे.
आज ती तुमच्यासमोर सादर करताना मला आनंद होत आहे. राहुल यांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटामधील 'दिल की तपीश...' हे गीत सादर करीत आपल्या गायन सत्राचा समारोप केला. निखिल फाटक (तबला), चैतन्य कुंटे (संवादिनी) आणि संहिता धर्माधिकारी व अंतरा नंदी यांनी गायनसाथ केली.
0 Comments