आरव पुणे निर्मीत आणि युवा संगीतकार निखील महामुनी यांच्यावतीने आयोजन
पुणे : देवा माय बापा, तू माझा केवळू... खुले देवघर...अशा परमेश्वराच्या जवळ नेणा-या कवितांसोबतच तू शब्द मला दे साधा...राधे तुज्या पायी गीत गायी... अशा कवितांच्या सादरीकरणाने शब्दांमधील तरल भावनांची सुरेल मैफल रंगली. चांगले काव्य, नवनिर्मितीचा आनंद देणारं संगीत आणि नानाविध कवींच्या कविता 'नेटक-यांसमोर' आॅनलाईन पद्धतीने पेश झाल्या.
'आरव'पुणे संस्थेच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मी गातो माझे गाणे हा सुप्रसिद्ध युवा संगीतकार निखिल महामुनी यांच्या संगीत रचनांचा आॅनलाईन कार्यक्रम झूम अॅपवर सादर झाला. नव्या कवितांच्या, नव्या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या रुपाने आगळेवेगळे सादरीकरण अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.
मी अनंताचा प्रवासी...हरी नाम जपाचा श्वास... शब्द मला दे साधा...जोडप्यांतील हरवत चाललेल्या संवादाविषयी भेट नाही पावसाची होत हल्ली... या कवितेच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. राधे तुज्या पायी...बाभळीची देहजाळी...तेव्हा मलाच माझा या गीतांना विशेष दाद दिली. एकाहून एक सरस कविता यावेळी सादर झाल्या. संगीत, संकल्पना, दिग्दर्शन आणि गायन निखील महामुनी यांनी केले.
निखिल महामुनी म्हणाले, कोरोनामुळे करण्यात आलेल्या जमावबंदीमुळे सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाले. परंतु रसिकांना संगीत श्रवणाचा आनंद देण्यासाठी आॅनलाईन संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे,मुंबई आणि महाराष्ट्रातिल विविध शहरांसह, भारतातील गुजरात,चेन्नई, हैद्राबाद, चंदीगड, दिल्ली,बेंगलुरु तसेच जगभरातील अमेरिका,लंडन,आॅस्ट्रेलिया,दुबई,जपान,सिंगापुर,नैरोबी,कॅनडा अशा विविध देशांमधील संगीत रसिकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अभय गोखले-कोथरुड,अमिता घुगरी-शनिवार पेठ, हर्षला वैद्य-तोतड़े-आॅस्ट्रेलिया,शिरीष कुलकर्णी-एरंडवणे, पुणे हे कलाकार सहभागी झाले होते. डॉ. सुनील काळे पुणे, डॉ. अरुणा ढेरे पुणे, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी देवगड, तुषार जोशी नागपूर, संतोष वाटपाडे नाशिक, स्वाती शुक्ल वसई हे कवी सहभागी झाले होते. संत तुकडोजी महाराज, स्व.आरती प्रभू यांच्या रचनांचे सादरीकरण कार्यक्रमात झाले.
0 Comments