पुणे : लाॅक डाउनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी आता शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी योग्य ती मदत व्हावी, यासाठी पुण्यात काँग्रेस कमेटीच्या वतीने काँग्रेस भवन में मार्गदर्शन तथा समन्वय केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार तसेच पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे मार्गदर्शनाखाली या केंद्राची स्थापना केली आहे.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस श्रीमती संगीता तिवारी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, पुणे शहर कॉंग्रेस सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड तसेच उत्तर भारतीय समाजाचे नेते कन्हैयालाल सहानी, राजेश दुबे महेंद्र सहानी, रवींद्र दुबे यांनी आज पुणे शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, येरवडा, वारजे माळवाडी व हडपसर यासह विविध ठिकाणी मजुरांच्या भेटी घेतल्या व त्यांना गावी जाण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राज्य व केंद्र सरकार तसेच काँग्रेस पक्ष परप्रांतीय भारतीय नागरिकांना आपल्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची व त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक वेळेची सर्व आवश्यक ती माहिती सांगण्यात आली.
दरम्यान पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने परप्रांतिय भारतीय नागरिकांना आपल्या मूळ गावी सोडण्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू झाले असून दोन दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशसाठी पुण्यातून विशेष ट्रेनद्वारे हजारो लोकांना सोडण्यात आले आहे याबाबतची माहिती दिल्यानंतर नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
तसेच मूळ गावी जावे लागणाऱ्या प्रवासासाठी पोलिस व अन्य परवाना अत्यावश्यक असून त्याबाबत पोलिसांनी युद्धपातळीवर काम हातात घेतले आहे. प्रत्येक स्थलांतर करू इच्छिणा-या मजुराने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊनच अर्ज भरून घेऊन परमिशन घ्यावी, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती संगीताताई तिवारी, मो. 9689454545 यांच्या वतीने पुणे शहर काँग्रेस भवन येथे स्थलांतरित मजुरांसाठी मार्गदर्शन व समन्वय केंद्र दररोज सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत सुरू करण्यात येत असून गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा व येताना आपल्या आधार कार्डची
झेरॉक्स सोबत आणावी असे आवाहन संगीता तिवारी यांनी केले आहे.
0 Comments