पुणे, दि. १६ मे २०२० : 'फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन' (फ्लो) पुणे चॅप्टरच्या २०२०-२१ या कालावधीसाठी डॉ. अनिता सणस यांची ६ व्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच डिजिटल व्यासपीठावरून 'फ्लो'च्या अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला असून हा निर्णय नवी दिल्लीच्या मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. सणस यांनी मावळत्या अध्यक्षा रितू छाब्रिया यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
या वेबिनारला माजी अध्यक्षा हरजिंदर तलवार, राष्ट्रीय अध्यक्ष जानबी पूखन, पुणे चॅप्टरचे सदस्य आणि देशभरातील फ्लो सदस्य उपस्थित होते. सणस यांनी २०१७-१८,२०१८-१९ या काळात फ्लोच्या कोषाध्यक्षा म्हणून काम पहिले होते. तसेच त्या २०१९-२० या काळात वरिष्ठ उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.
यावेळी सणस म्हणाल्या, "'शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटन' हा फ्लोचा राष्ट्रीय दृष्टीकोन आहे. त्यालाच जोडून महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आणणे हे माझे या वर्षाचे ध्येय आहे. यासाठी विविध कौशल्ये, प्रशिक्षण देणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे यासाठी माझ्या काही योजना आहेत.
त्याचदृष्टीने समाज आही फ्लो सभासदांसाठी काही कार्यशाळा आयोजित करणार आहोत. या बिकट काळात आम्ही काही संकल्पनांवर आधारित वेबिनार घेऊन आमच्या सदस्यांना प्रशिक्षण देणार आहोत. यातील पहिली संकल्पना 'काळाची गरज ओळखून व्यावसायिक धोरणांमधील बदल' ही असणार आहे.
आता सगळ्यांना चौकटी बाहेर पडून विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी मी शिक्षण, मनोरंजन, फॅशन, बँकिंग, डिजिटल मार्केटिंग, उत्पादन, बांधकाम आदि विविध क्षेत्रातील तज्ञांना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करणार आहे. जेणे करून व्यवसायाला नवे स्वरूप कसे प्राप्त करता येईल याविषयी मार्गदर्शन मिळेल."
सणस यांनी मार्केटिंग मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली असून 'अल्टरनेटिव्ह हीलिंग' या विषयात पीएचडी केली आहे. त्यांचे स्वतःचे 'हीलिंग सेंटर' असून त्यांच्या पतीच्या बांधकाम व्यवसायात त्या भागीदार आहेत. वाचन, संगीत, गायन यात त्यांना विशेष रुची आहे.
माजी महापौर बाबुराव सणस हे पुण्याचे पाहिले महापौर होते, हे औचित्य साधत डॉ. अनिता सणस यांच्या पहिल्या सत्राचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून ते 'जगाला विळखा घालून बसलेल्या कोविड १९ च्या साथीचा पुण्यावर झालेला परिणाम' या विषयावर बोलणार आहेत. हा डिजिटल कार्यक्रम दि. १८ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार असून उषा पूनावाला यावेळी अध्यक्षस्थानी असणार आहेत.
0 Comments