* मुख्यमंत्री मदत निधीत दिली ११ लाख रुपयांची देणगी
* ससून रूग्णालयासाठी दिले १५ लाख किमतीची वैद्यकीय उपकरणे
* २५०० हून अधिक बांधकाम कामगारांना एक महिन्याचे धान्य व किराणा याचे विनामूल्य वाटप
* अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणा-या महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या सन्मानार्थ विशेष ध्वनीचित्रफितीची
निर्मिती
पुणे - बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य अशा कुमार प्रॉपर्टीजतर्फे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत स्थानिक प्रशासनाला विविध स्तरावर सहाकार्य केले असल्याची माहिती प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कुमार प्रॉपर्टीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनीष जैन यांनी दिली.
मनीष जैन पुढे म्हणाले की, यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांची देणगी, पुणे कटक मंडळ अर्थात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रूग्णालयासाठी व्हेंटीलेटर, एबीआयएलच्या सहकार्याने ससून रूग्णालयासाठी रु. १५ लाख किमतीची वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. ही उपकरणे करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती करावयाची असल्यास उपयुक्त ठरणार आहेत.
याव्यतिरिक्त २५०० हून अधिक बांधकाम कामगारांना एक महिन्याचे धान्य व किराणा याचे देखील विनामूल्य वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधानांनी टाळेबंदीची घोषणा केली. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे.
याबरोबरच अत्यावश्यक सेवा सुरळीत रहाव्यात व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेच्या विविध भागातील कर्मचारी कोरोनाची भीती न बाळगता आपली ड्युटी चोखपणे निभावीत आहेत. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचा गौरव करण्यासाठी आम्ही एक ध्वनीचित्रफितीची निर्मिती केली आहे.
सदर ध्वनीचित्रफित ही समाजमाध्यमांवर वितरीत करून महानगरपालिका व विविध कटक (कॅन्टोन्मेंट) मंडळाचे कर्मचारी यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करूयात, असे मनीष जैन यांनी नमूद केले.
0 Comments