क्रेडाई पुणे मेट्रोच्या मदतीने सज्ज झाला आयसीयू वाॅर्ड

महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभागाची स्थापना 

ICU ward was equipped with the help of CREDAI Pune Metro

पुणे - कोविड १९ विषाणू विरुद्धच्या लढ्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोने पुढाकार घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले होते.

केवळ आठ दिवसांच्या विक्रमी कालावधीत पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात क्रेडाई पुणे मेट्रोने अद्ययावत असा अतिदक्षता विभाग (ICU) उभाही केला. या अतिदक्षता विभागाच्या उभारणीसाठी एक कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यकता होती. हा सर्व निधी क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे उपलब्ध करून देण्यात आला.

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या उपस्थितीत आज या अतिदक्षता विभागाचे हस्तांतरण करण्यात आले. पुणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, मुख्य शहर अभियंते प्रशांत वाघमारे, क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी तेजराज पाटील व आय. पी. इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.

या अतिदक्षता विभागात खाटा, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्शन मशीन, इसीजी मशीन इत्यादी अशा ४० अद्ययावत उपकरणांचा समावेश असून सध्याच्या काळात कोविड १९ शी लढणा-या रुग्णांना यामुळे अद्ययावत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना सुहास मर्चंट म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी क्रेडाई पुणे मेट्रोला कोविड १९ च्या या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासंदर्भात  दळवी रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारावा या संदर्भात आवाहन केले.

त्या वेळी आम्ही पुढील १५ दिवसात महानगर पालिकेच्या रुग्णालयामध्ये अद्ययावत अतिदक्षता कक्ष उभारू असे आश्वासन दिले. मात्र आमच्या पदाधिका-यांनी यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत विक्रमी आठ दिवसांच्या कालावधीत रुग्णांच्या सेवेसाठी हे आयसीयु युनिट तयार केले याचा आम्हाला आनंद आहे.

संकटाच्या या काळात आम्ही बांधकाम व्यवसायिक यामध्ये महापालिकेच्या सोबत आहोत असा विश्वास या निमित्ताने आम्ही देत आहोत.” 

या वेळी बोलताना शेखर गायकवाड म्हणाले, “शहरातील शिवाजीनगर भागातील दळवी रुग्णालय हे महिलांच्या प्रसूतीसाठीचे या भागातील एकमेव रुग्णालय होते. या ठिकाणी आता या संकटाच्या काळात अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने या भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

विक्रमी वेळेत तयार झालेला हा अतिदक्षता विभाग महानगरपालिकेच्या इतिहासात नोंद करण्यासारखा टप्पा झाला आहे. गरीब रुग्णांसाठी आता ख-या अर्थाने हे महापालिकेचे रुग्णालय आश्रयस्थान राहील याचा मला आनंद आहे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मी क्रेडाई पुणे मेट्रोचे आभार मानतो. 

मुरलीधर मोहोळ म्हणाले कि, आज कोविड १९ शी लढा देत असताना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मदतीचा हात देत आहे. क्रेडाई पुणे मेट्रोने देखील या संकटाच्या काळात आमच्या बरोबर सहभागी होत महापालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने सामाजिक दायित्व दाखवत मदतीचा हात पुढे केला आहे ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे.

या अतिदक्षता विभागामुळे गरीब रुग्णांना एक दिलासा मिळणार आहे, त्याबद्दल आम्ही क्रेडाई पुणे मेट्रोचे आभारी आहोत.

Tags - ICU ward was equipped with the help of CREDAI Pune Metro

Post a Comment

0 Comments