संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक
गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमाला
पुणे : संतांचे कार्य काय आहे, हे लोकमान्य टिळकांना समजले होते. त्यामुळे गीतारहस्य या ग्रंथाची सुरुवात त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली होती. तसेच समारोप देखील तुकाराम महाराजांच्या अभंगाने केला. लोकमान्य टिळकांवर संत व वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्याच्या व सामाजिक चळवळीत संतपरंपरेतील पैलूंचा उपयोग केला, असे प्रतिपादन संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनमालेत डॉ.सदानंद मोरे यांचे प्रवचन झाले. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले, वारकरी संप्रदायाचे दैवत हे श्री विठ्ठल. विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीता ही श्रीकृष्णाने सांगितली, श्रीकृष्ण हा विठ्ठलाच्या रुपात पंढरपूरमध्ये विटेवर उभा आहे. त्यामुळे गीता ही विठ्ठलाची आहे, असेच म्हणावे लागले. भगवद्गीतेचे मराठी रुपांतर म्हणजे ज्ञानेश्वरी. वारक-यांनी ही ज्ञानेश्वरी त्वरीत स्विकारली. त्यामुळे वारक-यांचा पहिला प्रमाणग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी.
ते पुढे म्हणाले, रामकृष्ण हरी हा वारक-यांचा मंत्र आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणून ओळख आहे. ज्ञानदेवे रचिला पाया... याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी वारक-यांना संप्रदाय हे स्वरुप दिले. ज्ञानेश्वरीने मराठी माणसाला सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक ओळख मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय स्वराज्य, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भाषिक स्वराज्य स्थापन केले. भाषिक स्वराज्याचे आपण नागरिक आहोत. गीता आणि भागवत हे ग्रंथ जरी संस्कृतमध्ये असले, तरी देखील मराठीमधील ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे ग्रंथ सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, दिनांक १२ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहेत. तसेच दिनांक १३ ते १९ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
0 Comments