ज्येष्ठ सत्याग्रही अनिल भदे यांचे मत : लोकतंत्र सेनानी संघ यांच्यावतीने पुणे शहर
व जिल्ह्यातील सत्याग्रही व मिसाबंदीचा मेळावा संपन्न
पुणे : ज्याप्रमाणे आपण ४७ वर्षांपूर्वी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या अन्यायकारक आणीबाणी विरोधी सत्याग्रहात भाग घेऊन कारावास स्वीकारण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही त्याचप्रमाणे सध्या खऱ्या अर्थाने भारताचे सार्वभौमत्व टिकवण्याच्या दृष्टीने धर्मांतरण व समान नागरी कायदा या विषयांबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करणे अत्यावश्यक आहे. असे मत ज्येष्ठ सत्याग्रही आणि लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अनिल भदे यांनी व्यक्त केले.
आणीबाणीतील सत्याग्रही व मिसाबंदीच्या (२५ जून १९७४) काळ्या दिवसाच्या निषेध दिनानिमित्त लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र पुणे जिल्हा यांच्यावतीने पुणे शहर व जिल्ह्यातील सत्याग्रही व मिसाबंदीचा मेळावा संपन्न झाला. यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे सहसचिव सुधीर बोडस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि ज्येष्ठ सत्याग्रही अशोक नाफडे उपस्थित होते.
अनिल भदे म्हणाले, शेकडो वर्षांपूर्वी मुघल मध्यपूर्वेकडून आक्रमण करून भारतात आले. हिंदूंवर अन्याय अत्याचार करून जबरदस्तीने हिंदूंचे मुसलमान धर्मात धर्मांतरण केले व हिंदुस्थानाचे अनेक तुकडे केले. भारतात स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे होत आली आहेत तरीदेखील अशा प्रकारे बळजबरीने किंवा निरनिराळी आमिषा दाखवून तसेच हिंदू मुले मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतरण केले जात आहे, याबाबत समाजात जागृती व सतर्कता निर्माण करून धर्मांतराचे संकट परतवून लावूयात.
तसेच फक्त लव्ह जिहाद सुरु नसून आता सर्विस जिहाद, पॉवर जिहाद पण वाढत चालला आहे. भारत हे एक राष्ट्र असल्यामुळे देशातील सर्व नागरिकांसाठी एकच समान नागरी कायदा असायला हवा तरच धर्मनिरपेक्षतेचे तत्व खऱ्या अर्थाने बळकट होणार आहे.
देशातील विधी आयोगाने समान नागरी कायद्याची गरज आहे का? यासाठी देशातील नागरिकांकडून तसेच देशातील सामाजिक सार्वजनिक, धार्मिक संस्थांकडून त्यांची मते आजमावण्याचे ठरविले आहे. येत्या ३० दिवसात नागरिकांनी आणि संस्थांनी याबाबतच्या प्रतिक्रिया विधी विभागास कळवायच्या आहेत. असेही त्यांनी सांगितले. शैला सोमण यांनी आभार मानले.
0 Comments